Sunday, 22 November 2015

आन्टनी लैरीस

आन्टनी लैरीस त्याचं नाव. त्याच्या फ्रेंच नावाचा उच्चार करणंही महाकठीण. पण परवाच्या पॅरीस हल्ल्यात अतिरेक्याच्या गोळयांना त्याची बायको - हेलन बळी पडली आणि त्यानं आपल्या बायकोला जीवे मारणा-या अतिरेक्याला उद्देशून फेसबुकवर ही पोस्ट लिहिली, पेटत्या उरानं हे शब्द उच्चारणं तितकंच कठीण आहे.
लैरीस लिहतो –

तुला कळलंय का,
शुक्रवारी रात्री तू संपवलं आहेस,
एक आगळं वेगळं आयुष्य ..
ती माझ्या प्रेमाची जितीजागती मूर्ती होती
माझ्या लहानग्याची मायाळू ‘ममा’ होती…
पण तरीही,
माझ्या मनात तुझ्यासाठी
लवलेशही नाही द्वेषाचा ..!

मला नाही माहीत कोण आहेस तू ?
आणि खरं सांगू,
मला ते जाणून ही घ्यायचं नाही ऽ
आत्म्याचं थडगं झालंय ज्यांच्या
त्यांना असते का काही नाव गाव ?

वेडया,
तू जेव्हा बेधुंद चालवित होतास ,
तुझ्या निर्दयी गोळया
माझ्या प्रियेच्या देहावर
तेव्हा,
तुझ्या प्रत्येक गोळीसरशी
जखमी होत होता तुझा खुदा
रक्ताळत होते त्याचे ह्रदय ,
ज्याने स्वतःच्या प्रतिमेबरहुकूम
बनविले होते तुला …!!!
---------------------------------

---------------------------------

द्वेष आणि सूडाची भेट
तरीही,
मी देणार नाही तुला..!
अजिबात नाही..!!
मला आहे ठावे,
तुला हीच भेट हवी आहे.
पण तुझ्या आंधळया द्वेषाला
पांगळया रागाने प्रत्युत्तर देण्याचा
अडाणीपणा मी करणार नाही,
मी नाही जाणार बळी
तिरस्काराच्या या वेडगळ वणव्यात ..!

तुला घाबरावयाचे आहे मला,
तुला वाटते,
मी पाहवे संशयाने
माझ्या प्रत्येक देशबांधवाकडे
आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी
मी ओलिस ठेवावे माझे स्वातंत्र्य ..
सॉरी,
असे काहीच नाही होणार,
हरला आहेस तू …!

अरे,
रात्रंदिवस मी वाट पाहत होती तिची
आणि
अखेरीस आज सकाळी मी पाह्यलं तिला.
तुला सांगू,
बारा वर्षांपूर्वी मी तिला पहिल्यांदा पाहयलं
आणि वेडयासारखा तिच्या प्रेमात पडलो,
त्या क्षणाची आठवण झाली…
तुझ्या गोळयांनी देहाची चाळण झालेली असतानाही
आजही ती तेवढीच सुंदर दिसत होती रे…

माझं चिमुकलं जग उध्वस्त झालंय
मानायचाच असेल तर,
हाच तुझा थोडासा विजय..!
पण माझी ही वेदना फार काळ टिकणार नाही
कारण
मला पक्के ठावे आहे,
ती सदैव माझ्यासोबतच असणार आहे
आणि
आम्ही पुन्हा विहरत राहू
आमच्या अनोख्या प्रेमाच्या नंदनवनात,
जिथे तुला पाऊल टाकायलाही बंदी आहे.

आता आम्ही दोघेच आहोत
मी आणि माझा लहानगा मेल्वील
अवघ्या सतरा महिन्यांचा आहे तो..!
पण लक्षात ठेव,
जगातल्या कोणत्याही सैन्याहून
बलशाली आहोत आम्ही बापलेक..!
तुझ्याकडे लक्ष दयायला वेळच नाही माझ्याकडे,
दुपारच्या झोपेतून आता जागा होईल माझा पोर
मला भरवायचे आहे त्याला
मग
आम्ही बापलेक खेळायला जाऊ…
आणि हो,
हा माझा चिमुकला मेल्वील
असाच मोकळा ढाकळा राहिल
पाखरासारखा
आनंदी असेल
गोजि-या फुलपाखरासारखा
आणि
तुझ्या काळजावर
उमटत राहिल भितीचा थरकाप
कारण
त्याच्याही मनात तुझ्यासाठी
द्वेषाचा लवलेशही नसेल.

( भावानुवाद – डॉ प्रदीप आवटे )

No comments:

Post a Comment